(वैभव जगताप )
मुंबई :रिंकू पाटील प्रकरणाने नव्वदच्या दशकात महाराष्ट्र हादरला होता, तसाच तो हिंगणघाट प्रकरणात शिक्षिकेवर झालेल्या एकतर्फी प्रेमातून हल्ल्यामुळे पुन्हा हादरला, एकविसाव्या डिजिटल क्रान्ती आणि डिजिटल भारतात समाजाच्या मानसिकतेची प्रगती झालेली दिसत नाही महाराष्ट्रात विकृत आणि समाजातील विकृतपणाचा व्हायरस हत्याकांड किंवा दुर्घटना घडल्यानंतर शोधण्याची परंपरा वाढीस लागली आहे.
उल्हासनगर मधील रिंकू पाटील प्रकरण, सातारयातील अमृता देशपांडे, ठाण्यातील प्रियांका खराडे आणि प्राची झाडे आणि नुकतेच घडलेले वर्ध्यातील हिंगणघाट प्रकरण, विकृतीचा व्हायरस हा फक्त विकृतापुरता मर्यादित राहीला नसून समाजाला बाधा निर्माण करताना वाढीस लागला आहे.
रिंकू पाटील हत्याकांडाने १९९० साली फक्त उल्हासनगर हादरले न्हवते तर संपूर्ण भारतीय समाज बिथरला होता, स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्री बाई फुले यांच्या विचारांनी प्रेरीत, शिक्षित पुरोगामी महाराष्ट्रात त्यावेळी परीक्षाकेंद्रावर हल्ला करत रिंकू पाटील या विद्यार्थिनींचा बळी गेला होता, मारेकरी हरेश पटेल याने तर गुन्हा केलाच पण या हत्याकांडाला उघड डोळ्यांनी पहाणारा समाज, अशा घटनांचे तर्क लावत बसणारा समाज, अशा गोष्टीं पाहून दाराच्या कड्या लावून टिव्ही वर बातम्या पाहणारा समाज देखील याला जबाबदार होता, आता डिजिटल तंत्रज्ञाच्या काळात तो मोबाईलवर शूटिंग करून सोशल मिडीयावर पोस्ट टाकण्यात अग्रेसर झालेला समाज हा देखील तितकाच जवाबदार झाला आहे, अशा घटना टाळण्यासाठी अथवा अशा नराधमांना रोखण्यासाठी, अशा घटना घडल्यानंतर मेणबत्त्या पेटवणारा आणि मूक मोर्चे काढणारा समाज देखील मला गुन्हेगार वाटत आहे. रिंकू पाटील समाजातील पाशवी मानसिकता, निष्क्रियता आणि भ्याडपणा याची शिकार ठरली तीच अवस्था आज देखील तशीच आहे, हिंगणघाट घटनेत अंकिता पिसुदे या पिडीत शिक्षिकेच्या बाबतीत देखील समाजातील भ्याडपणाच समोर आलेला दिसतोय, उपस्थित बघ्यांनी तिला वेळीच मदत न करता मोबाईल शूटिंग करण्यात आपली हिडस मानसिकता दाखवली.
         मार्च १९६४ साली किटी जेनोवेस हिचा न्यूयॉर्क शहरात शेजारच्या लोकांच्या डोळ्यादेखत निर्घृण खून झाला होता, शेजारच्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतली होती पण पुढे कोणीच आले नाही, रिंकू पाटील घटना नव्वदच्या दशकात महाराष्ट्राला हादरविणारी होती पण न्यूयॉर्क च्या घटनेतील आणि रिंकू पाटील या घटनेतील साम्य हेच की लोक वेडे ठरले होते त्यांच्यातीळ भ्याड मानसिकतेमुळे. दोघींच्या घटनेत वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न तिथे उपस्थित लोकांमधून झाला नाही. भारतीय समाज अशा दुर्घटनेनंतर सुज्ञ होतो हे अनेकदा अशा घटना घडल्यानंतर मेणबत्त्या आणि मोर्चे यातून दिसून येते. भारतीय समाज लवकर  जजमेंटल होतो आणि आपल्यातील  संवेदनशीलेचे दर्शन अशा घटना घडल्यानंतर देत असतो. न्यूयॉर्क मध्ये ही घटना घडल्यानंतर अमेरिकन नागरिकांनी आणि समाज विचारवंतांनी समाज मंथन करायला सुरुवात केल्यानंतर ” समाज असा का वागला ? लोकांनी पुढाकार का घेतला नाही ? अशा घटना कोणत्या विकृतीतून घडत आहे त्याचे माध्यम काय ? अशा अनेक प्रकारे विचारमंथन करण्यासाठी पुढाकार घेतला गेला होता. भारतात हे शक्य का नाही ? अशा परिस्थीतीत समाजाने काय भूमिका घ्यायची याचा विचार का होत नाही, घटनेनंतर सुज्ञता दाखविण्यापेक्षा याचा अभ्यास ,संशोधन होणे आज गरजेचे आहे. उल्हासनगर, ठाणे ते हिंगणघाट या संपूर्ण घटनांचा आणि समाजाने अशा समाजातील विकृत वर्तणुकीचा आदर्श ठेवायचा की जोपर्यंत माझ्या घरापर्यंत येत नाही तो पर्यंत मी बोलणार नाही हा दृष्टीकोन ठेवायचा. दोन्ही गोष्टी समाजाला आरोपीच्या पिंजरयात बसवतात, पण समाज प्रत्यक्षपणे – अप्रत्यक्षपणे विकृतांबरोबर विकृतीत सामील होत आहे याचे भान विसरत आहे. न्यायप्रणालीच्या बाबतीत अशा घटनांना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीना जबर शिक्षा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाच पाहिजे, सांगलीतील अमृता देशपांडे हत्या प्रकरण, उल्हासनगरच्या रिंकू पाटील हत्या प्रकरणात ऍडव्होकेट विजया कापसे-ताहिलरमाणी यांनी आरोपींना शिक्षा देण्यासाठी आपले कसब पणाला लावले होते. अशा प्रकारे त्यांचा आदर्श ठेवत सरकारी वकिलांनी पीडितेला न्याय मिळावा म्हणून पुढाकार घेत समाजात अशा प्रवृतीना जरब बसावा असे प्रयत्न झाले पाहिजेत. आणि अशी फळी निर्माण झालीच पाहिजे तर अशा घटनांना न्याय मिळू शकेल.
ठाणे येथील बेडेकर कॉलेजमध्ये शिकत असलेल्या प्राची विकास झाडे या २१ वर्षीय तरुणीची, अर्धवट शिक्षण सोडलेल्या एका २५ वर्षीय आकाश पवार या माथेफिरू तरुणाने  चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. प्राचीला ठाणे शहराकडून मुंबई-नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर या माथेफिरूने अडवले व तिच्यावर धारदार चाकूने ९ वार करून तिची हत्या केली. त्यानंतर या माथेफिरूने बसपुढे येऊन स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फसला. तो जिवंत पोलिसांच्या हाती लागला. भररस्त्यात एका असहाय्य मुलीवर कुणीतरी माथेफिरू सपासप वार करीत आहे हे दिसत असतानाही त्या मुलीला वाचविण्यासाठी कुणी पुढे आला नाही. ती तरुणी रक्ताच्या थारोळय़ात पडल्यानंतर काहीजण मदतीसाठी रुग्णालयात न्यायला पुढे आले,तर काही रिक्षाचालकांनी गंभीर जखमी झालेल्या प्राचीला रिक्षात घेण्यास नकार दिला. तेव्हा प्राचीला एका टेम्पोतून रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तोपर्यंत तिने हे जग सोडले होते. आकाश पवार या माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून हे भीषण कृत्य केले होते. प्राचीच्या प्रेमात पडलेल्या आकाशविरुद्ध  पोलीस ठाण्यात प्राचीच्या वडिलांनी वेळोवेळी तक्रार केली होती. आकाशला पोलिसांनी तशी नोटीस देखील दिली होती. परंतु त्या नोटिसीचा काही उपयोग झाला नाही. पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या धमकीला न घाबरता आकाशने प्राचीला त्रास देत संपवून टाकले होते, माध्यमांनी एक दोन दिवस फक्त बातमी करत प्राचीच्या हत्येचा विषय संपवला.लोकांच्या संवेदना किती बोथट झाल्या आहेत हे या घटनेवरून दिसून आले.अशा घटना रोज कुठे ना कुठे घडत असतील त्यात काय ?  असा समाजाचा दृष्टिकोन झालेला दिसला. आपल्या मुलीचे काय चुकले हाच सवाल एक पिता म्हणून प्राचीच्या वडिलांना शेवटपर्यंत सतावत होता, विकृतीचा व्हायरस शिरलेल्या समाजाने असे प्रश्न पालकत्वाच्या नात्याने स्वतः:ला विचारणे सुरु केले तर असे गुन्हे रोखता येऊ शकतात. बाकी लोक पुढे येत नाहीत मी कसा जाऊ ? बाकी लोक पोलीस चौकशी मुळे पुढे येत नाहीत मी यात अडकलो तर ? इतरांसारखे….  छोडो भाय काय के लिये टांग अडानेका हा रवैय्या. नाहीतर फार फार तर चर्चा, हताश भावना, लांब श्वास आणि एक भविष्यवाणी आणि हे बस असेच चालू राहणार हा रवैय्या.
यूएसऐ अर्थात उल्हासनगर और उल्हासनगर का माल, गुंडो की बस्ती ही समाजाने व्यापारी शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर शहराला दिलेल्या ओळखी आहेत, १९९० साली याच उल्हासनगरातील एसएससीच्या परीक्षा केंद्रात आगडोंब उसळला. ३० मार्च १९९० रोजी हातात तलवार, पिस्तूल व पेट्रोलचा कॅन घेऊन घुसलेल्या चार गुंडांनी बंदोबस्तासाठी असलेल्या दोन पोलिसांवर नियोजित पद्धतीने हल्ला करत, परीक्षा केंद्राच्या टेलिफोनच्या वायर कापल्या, त्यावेळी टेलिफोन हे एकमेव जलद संवाद माध्यम होते, परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्याच्या वर्गात शिरून त्यांनी दरवाजा आतून बंद करत, सेंचुरी रेयॉन हायस्कूलमधील रिंकू पाटील या १६ वर्षीय मुलीला इतरांपासून वेगळे करून तिच्यावर पेट्रोल ओतले आणि आग लावली पाहता पाहता  रिंकू जागेवरच कोळसा झाली.दुसऱ्या दिवशी सर्वच वर्तमानपत्रांनी या भीषण घटनेची दाखल घेत रिंकू पाटील हत्याकांड प्रसिद्धीला आणले, माध्यमांनी अनेक दिवस रिंकूच्या हत्येची बातमी चालवली. १६ वर्षीय रिंकूच्याच शेजारी राहणाऱ्या हरेश पटेल या २२ वर्षीय माथेफिरूने रिंकूने लग्नास नकार दिला म्हणून असा सूड उगवला होता. एसएससी परीक्षेला बसलेल्या रिंकूला अमानुषरीत्या मारणाऱ्या हरेश पटेलने या भीषण घटनेनंतर रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. रिंकूने हरेश पटेलची मैत्री संपवली होती. परंतु त्याने तिचा पिच्छा सोडला नव्हता. एकतर्फी विकृतीचा हा कळस होता आणि रिंकूला जळताना पाहणार आणि मदतीला न धावणारा समाज विकृत होण्याच्या दिशेने जात होता. रिंकूच्या मारेकऱ्याने स्वतः प्रायश्चित्त करून घेतले तर त्याच्या अन्य साथीदारांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यावेळी उल्हासनगरात रिंकूच्या पेटत्या देहाचे व्हिडीओ शूटिंग केले गेले होते आणि त्याच्या कॅसेट हजार-बाराशेला त्या वेळी विकल्या गेल्या होत्या. उल्हासनगरमधील  १६ वर्षीय अल्पवयीन रिंकू पाटील जळीत हत्याकांड जुनी पिढी आजही विसरलेली नाही. ठाण्यातील प्राची झाडे व उल्हासनगरातील रिंकू पाटील हत्याकांडातील दोन्ही आरोपींच्या विकृतीत बळी निरागस जीव गेले होते आणि समाज बघ्याच्या भूमिकेत दिसत होता.
समाजात अशा घटनांसंदर्भात रोज शेकडो तक्रारी पोलीस ठाण्यात मुलींच्या पालकांकडून केल्या जातात. पोलीस त्या तरुणाला, त्याच्या आईवडिलांना बोलावून समज देतात. त्यातील बरेचजण ऐकतात. त्या मुलींच्या वाटेला जात नाहीत. परंतु काही विकृतांवर त्याचा परिणाम होत नाही. पोलिसांत तक्रार केल्यावर त्यांचा अहंकार दुखावतो व ते अधिक हिंसक होतात. असे बऱ्याच प्रकरणांतून उघड झाले आहे. तेव्हा आजच्या तरुण मुलींनी अशा विकृतांपासून सावध राहणे हा एकमेव उपाय आहे. आजच्या तरुण मुलींनी नवीन मित्रमैत्रिणी जमविण्यापेक्षा आपल्या आईवडिलांशी मैत्री आणि संवाद करावा, टिकटॉक आणि मोबाईल, चॅटिंग आणि सोशल माध्यमे वापरताना  विशेष काळजी घ्यावी आणि त्या संदर्भातील कायदे समजून घ्यावेत, शक्यतो आई वडिलांना मित्र करावे. सोशल माध्यमे आणि स्मार्ट फोन कीड किंवा व्हायरस म्हणून नावारूपाला येऊ न देण्याची काळजी समाजातील तसेच विकृती रोखण्यासाठीची जबाबदारी सर्वस्वी समाजाची आहे. आई वडील पालकांनी आपल्या पाल्याला अशा घटना आणि त्यामागची विकृती लहानपणापासूनच मुलांना सांगितली गेली पाहिजे, मुलांच्या या विषयातील प्रश्न आणि त्याची वास्तविक उत्तरे आणि करणे सांगितली गेली पाहिजेत. असे कित्येक आई- वडील तयार व्हायला हवेत ज्यांनी अशा घटनांनंतर आपल्या मुलांशी संवाद साधत समाजातील वाढीस लागलेली गुन्हेगारी, गुंडगिरी आणि समाजातील विकृती यांची उघडपणे चर्चा करायला हवी. अशा घटना घडत असताना समोर येत त्या वेळीच कशा रोखल्या जाऊ शकतात याचे धडे द्यायला हवेत. पालकानी  शाळा, महाविद्यालयात जाऊन आपल्या पाल्याची, मित्रवर्गाची आणि प्राध्यापक वर्गाची वेळोवेळी भेट घेऊन संवाद साधायला हवा. अशा घटना घडत असताना किंवा घडण्याआधी काय करायला हवे याचे सामान्य शिक्षण शाळा महाविद्यालयांनी वेळोवेळी देणे गरजेचे आहे, फक्त प्रगती पुस्तक आणि शाळेच्या डायरी फक्त फि वाढ आणि पाल्याच्या घोकंपट्टीचे मुल्याकंन करायला नसते हे शाळा महाविद्यालय चालविणाऱ्या बौद्धिक वर्ग प्रशासनाने समजून घेणे आवश्यक आहे तसे प्रशिक्षण वर्ग हे ज्युडो, कराटे आणि बॉक्सिंग या सोबत देखील महत्वाचे आहेत. अशा घटना घडत असताना तिथून बाजूला होणे अथवा त्याला कानाडोळा करत काहीच माहीत नसल्याचा आव आणणारा समाज विकृत मनोवृत्तीचा होत असतो आणि आपल्या मुलांना हेच शिकवत असतो, पण तो हे विसरतो की अशी घटना माझ्या मुलांच्या बाबतीत देखील घडू शकते. समाजतील अशा घटनांचे मूक साक्षीदार समाजात तयार करू नका, हा व्हायरस वेळीच रोखता येऊ शकतो त्यासाठी आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुण मुलींवर ऑसिड फेकणाऱ्या, पेट्रोल ओतणाऱ्या, चाकू-सुऱ्यांनी अमानुष हल्ला करणाऱ्या नराधमांनाही (फास्ट ट्रक कोर्टात केस चालवून) फाशी दिली पाहिजे ही मागणी समाज करतोय त्यात गैर नाही पण अशा घटना भविष्यात  घडू नयेत आणि घडत असताना प्रतिकार करणारा, पीडितेच्या वेळ प्रसंगी धावून जाणारा सतर्क समाज देखील घडला गेला पाहिजे ही जबाबदारी समाजातील प्रत्येक स्तराची आहे, मोबाईल, स्मार्ट फोन घटनेचे वार्तांकन करण्यासाठी आणि सोशल पोस्ट शेअर करण्यासाठी म्हणून न वापरता आधी जबाबदारी काय आहे याचे भान जपणारा समाज काळाची गरज आहे, नाहीतर एकतर्फी प्रेम करणाऱ्या विकृतांचे प्रमाण आणि अशा प्रकरणात बघ्यांच्या भूमिकेत राहून फक्त मोर्चे आणि निषेध म्हणून मेणबत्त्या पेटवणारा एक प्रकारचा विकृतपणा समाजात आपण वाढीस लावतॊय हेच सतत आपल्याला दिसत राहील. भारतीय समाजाला विचारमंथनाची गरज आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here